अखेरच्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या

0

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान शनिवार, दि. १ जून रोजी होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या ७ व्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संपला, ८ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील ५७ लोकसभा मतदारसंघात हे मतदान पार पडणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, पंजाब, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि चंदीगडमधील मतदारसंघांचा समावेश आहे. अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

२०१९ मध्ये भाजपने या ५७ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. यासोबतच टीएमसीने ८ तर काँग्रेसने ७ जागा जिंकल्या होत्या. मागील निवडणुकीत या ५७ जागांवर एकूण ६५.२९ टक्के मतदान झाले होते. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७८.८० टक्के मतदान झाले. त्याचवेळी बिहारमध्ये सर्वात कमी ५१.३४ टक्के मतदान झाले होते. सातव्या टप्प्यात एकूण ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण उमेदवारांपैकी ३२८ पंजाबमधील, १४४ उत्तर प्रदेश, १३४ बिहार, ६६ ओडिशा, ५२ झारखंड, ३७ हिमाचल प्रदेश आणि ४ चंदीगडमधील आहेत.सातव्या टप्प्यात हाय होल्टेज लढती होत आहेत.

यामध्ये वाराणसीच्या जागेचा समावेश आहे. या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते अजय राय यांच्यात लढत होत आहे. पीएम मोदी २०१४ आणि २०१९ मध्ये वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले आणि आता त्यांच्या तिस-या कार्यकाळाकडे लक्ष लागले आहे. अजय राय पूर्वी भाजपचे नेते होते. परंतु २०१२ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यासोबतच हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपने अभिनेत्री कंगना रणावत यांना तर कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग यांना उमेदवारी दिली आहे. मंडी हा वीरभद्र कुटुंबासाठी बालेकिल्ला आहे. ही लढतही महत्त्वाची मानली जात आहे. यासोबतच उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघातून भाजपने अभिनेते आणि राजकारणी रवी किशन यांना मैदानात उतरविले आहे. त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाच्या उमेदवार काजल निषाद यांना उमेदवारी मिळालेली आहे.

यासोबतच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेशातील हमीरपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने सतपालसिंह रायजादा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ही लढतही लक्षवेधी आहे. याशिवाय ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवार अभिषेक बॅनर्जी हे पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचेही भवितव्य अखेरच्या टप्प्यात मतपेटीत बंद होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech