नवी मुंबई – अलिकडे काही लोकांकडून फ्लेमिंगो पाहण्यासाठी तसेच त्यांच्या हालचालींचे शूटिंग करण्यासाठी ड्रोनचा वापर होऊ लागला आहे. यामुळे नवी मुंबईच्या एनआरआय आणि डीपीएस तलाव क्षेत्रातील फ्लेमिंगोच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर येथील पर्यावरणप्रेमींनी याबाबत मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. दहा दिवसांपूर्वी एमिरेट्सचे विमान मुंबई विमानतळावर उतरत असताना अपघात होऊन तब्बल ३९ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला होता.
‘फ्लेमिंगो’ या गुलाबी पक्ष्यांना जवळून पाहण्यासाठी पाणथळ प्रदेशात येणाऱ्या पक्षीप्रेमींसह अनेक नागरिक फ्लेमिंगोंच्या थव्यांवर ड्रोन उडवत आहेत. काहीवेळा हे ड्रोन पक्ष्यांपेक्षा फक्त एक किंवा दोन फूट अंतरावरून उडवले जातात, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ड्रोनचे प्रोपेलर ब्लेड गुलाबी पक्ष्यांना घातकवन्यजीव संरक्षण कायदा – १९७२ अंतर्गत येणाऱ्या नाजूक पक्ष्यांना ड्रोनचे धारदार, फिरणारे प्रोपेलर ब्लेड मोठी दुखापत करू शकते. सर्वांत वाईट आणि त्याहूनही धोकादायक गोष्ट म्हणजे ड्रोन, फ्लेमिंगोंच्या उड्डाणावेळीही त्यांचा मागोवा घेतात, असे नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले. यामुळे फ्लेमिंगो झोनपासून ड्रोनच्या वापरास मनाई करावी, त्यासाठी सरकारने आदेश द्यावेत. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे पोलिस महासंचालक, नवी मुंबई पोलिस आयुक्त आणि मॅन्ग्रोव्ह सेल यांनादेखील ई-मेल पाठवला आहे.