मुंबई – लोकसभा निवडणुकीचे मतदान १ जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदानानंतर पार पडले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी (मंगळवारी) जाहीर होणार आहे. त्यापूर्वी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. यातून एनडीएला सर्वाधिक जागा मिळणार असून पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘कालच्या एक्झिट पोलमध्ये ठरवून दिलेले आकडे आहेत. राजस्थानमध्ये २६ जागा आहेत. एक्झिट पोल बनवणा-या १०० कंपन्या आहेत. ते फुकट काम करत नाहीत. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं त्यांचं काम असतं. एक्झिट पोल कंपनीने त्याठिकाणी भाजपला ३३ जागा दाखवल्या. मला वाटलं होतं हे सर्व मिळून भाजपला ८०० ते ९०० जागा देतील. मोदी ध्यानाला बसले होते, कॅमेरे लावण्यात आले होते. त्यांनी साधना, तपस्या केली त्यामुळे ३६०-३७० काहीच नाही,’ ’असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.
पुढे ते म्हणाले, ‘अत्यंत फ्रॉड असे एक्झिट पोल आहेत. एक्झिट पोल हा कॉर्पोरेट धंदा आहे. ध्यानाला बसून जागा जिंकता येत नाहीत. एक्झिट पोलवर आमचा अजिबात विश्वास नाही. कालचा एक्झिट पोल ‘पैसा फेको तमाशा देखो’ असा आहे. राज्यात कोण जिंकतंय, का जिंकत आहेत हे आम्हाला माहिती आहे. इंडिया आघाडी सरकार बनवणार. आम्हाला २९५ ते ३१० इतक्या जागा मिळतील. लोकांमधून घेतलेला हा कल आहे. आम्ही सरकार बनवत आहोत. मोठे पक्ष अशा एक्झिट पोल कंपन्यांना पैसे देतात. त्यामुळे आमचा यावर विश्वास नाही.’’