नवी दिल्ली – अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 15 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी यापैकी तीन जण निवडून आले आहेत. तर एक उमेदवार दोन मतांनी पडला आहे. दुसरा उमेदवार 200 मतांनी पडला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे 46 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपने विधानसभेतील आपली सत्ता राखली. मात्र, अजित पवारांचे 3 उमेदवार निवडून आले तर 3 उमेदवार अतिशय थोडक्या मतांनी पडले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेशमध्ये यश मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फेसबुकच्या माध्यमांतून प्रतिक्रिया दिली. अजित पवारांनी अरुणाचल प्रदेशमध्ये मिळालेल्या यशानंतर एक फेसबुक पोस्ट केली आहे.
अजित पवार लिहितात, अरुणाचल प्रदेश येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार निवडून आल्याबद्दल मी तिन्ही उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. हा विजय ऐतिहासिक असून या निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम आज फळास आले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन करतो. पुढे अजित पवार म्हणाले, विशेष बाब म्हणजे एकूण मतांच्या 10.06 टक्के मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात पडली, याचा फार आनंद आहे. अरुणाचल प्रदेशच्या मतदार राजानं आमच्या पक्षाच्या उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हीच आमची ताकद असून याच ताकदीच्या जोरावर यापुढे विकासाची गंगा अरुणाचल प्रदेशमध्ये वाहेल असा शब्द देतो.