पुणे – लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरु आहे. सर्वच लोकांचे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे. शरद पवार गट व अजित पवार गटासाठी बारामती लोकसभा मतदार संघ प्रतिष्ठेची लढाई ठरला होता. बारामती येथील निकालावर अजित पवार यांचे राजकीय भविष्य ठरवले जाणार आहे. सुप्रिया सुळे या सध्या आघाडीवर असून विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सर्वांशी संवाद साधला आहे. तसेच जनेतेचे आभार मानले आहेत.शरद पवार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या जनतेचे महाविकास आघाडीला कणखर साथ व पाठिंबा दिल्याबद्दल आभार म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रामध्ये एकप्रकारे परिवर्तनाला पोषक ठरणारा निकाल आहे. जाती धर्माच्या पुढे जाऊन रोजगार महागाईच्या मुद्द्यावर जनतेने कौल दिला. ही लोकसभेची निवडणूक झाली त्यामधील निर्णय या देशपातळीवर असणारा आशादायक निर्णय आहे. विषेशत: उत्तर प्रदेशमध्ये जे काही अंदाज बांधण्यात आले त्यापेक्षा वेगळा निकाल जनतेने दिला आहे. या पूर्वी भाजपला उत्तर प्रदेशमध्ये मिळणारं यश मोठ असायचं. त्यानंतर आता मर्यादित जागा मिळवल्या आहेत. याचा अर्थ आमचे काम अधिक लोकांना आवडत आहे.”
यापुढे शरद पवार म्हणाले, “मी निकाल आल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी आणि अन्य यांच्यासोबत चर्चा केली. उद्या आमची दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. उद्याच्या बैठकीमध्ये सामुदायिक पद्धतीने पुढची रणनीती आणि धोरण ही चर्चा करुन ठरवू. या निवडणूकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या झाल्या आहेत. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगली लढत दिली. आम्ही 7 जागांच्या वर आमचा विजय होण्यात जमा झाला आहे. आमच्या आघाडीमधून एकत्रित जीवाभावाने काम करण्याची तयारी दाखवली. म्हणून हा विजय आम्हाला मिळाला. हे आमचं एकट्याचं यश नसून महाविकास आघाडीचं यश आहे. यापुढे देखील आम्ही जनतेची सेवा करण्याची धोरण ठरवू आणि खबरदारी घेऊ,”असे मत त्यांनी मांडले.