४०० पार दूरच, भाजपची २४०वरच दमछाक, काँग्रेसचा ५२ ते ९९ प्रवास

0

मुंबई – एक्झिट पोलचे अंदाज चुकवत देशातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या हाती एकहाती सत्ता सोपवण्याऐवजी २९७ जागांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने कौल दिला आहे. तसेच मागील दोन दशकांपासून अत्यंत कमकुवत ठरलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीलाही २३२ जागांसह नवे बळ दिले आहे. अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या भारतातील सार्वत्रिक लोकसभा २०२४ निवडणुकीचा निकाल मंगळवार ४ जून रोजी जाहीर झाला. सकाळी ८ वाजल्यापासूनच्या निकालांमध्ये एनडीएने बहुमताची २७२ची मॅजिक फिगर गाठली आहे.

त्यामुळे पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी सलग तिसर्‍यांदा विराजमान होतील, मात्र केंद्रात मोदी सरकार नव्हे तर एनडीएची सत्ता असेल. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अब की बार ४०० पार म्हणत प्रचाराचा धुरळा उडवून देणार्‍या भाजपची २५० जागांपर्यंत पोहचतानाच दमछाक झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत ३०३ जागा मिळवणार्‍या भाजपला ५३ जागांचा फटका बसला आहे, तर २०१९ च्या तुलनेत काँग्रेसने ४८ जागा कमावल्या आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशने भाजपसह एनडीएच्या अपेक्षांना सुरूंग लावण्याचे काम केले आहे.
निकालानंतर नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएतील मित्रपक्षांचा आवर्जून उल्लेख केला. भारताच्या जनतेने भाजपवर तसेच एनडीएतील सर्वच घटक पक्षांवर पूर्ण विश्वास दाखवला आहे. त्यामुळे सलग तिसर्‍यांदा एनडीएचे सरकार सत्तेत बसणार आहे. आजचा हा विजय जगाच्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय आहे. भारताच्या संविधानावर असलेल्या अतूट निष्ठेचा विजय आहे. हा विकसित भारताच्या निश्चयाचा विजय आहे. सब का साथ, सब का विकास, या मंत्राचा विजय आहे. १४० कोटी भारतीयांचा हा विजय आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

आजचा हा क्षण मलादेखील भावूक करणारा आहे. माझ्या आईच्या निधनानंतर ही माझी पहिलीच निवडणूक होती, पण देशाच्या कोटी कोटी माता, भगिनींनी आईची कमतरता मला भासू दिली नाही. मी संपूर्ण देशात जिथे जिथे गेलो तिथे माता, बहिणी, मुलींनी अभूतपूर्व स्नेह आणि आशीर्वाद दिला. ते आकड्यांमध्ये दिसू शकत नाही. देशाच्या इतिहासात महिलांद्वारे मतदानाचे सर्व रेकॉर्ड तुटले. मी देशाच्या निवडणूक आयोगाचेही अभिनंदन करतो. निवडणूक आयोगाने जगाची सर्वात मोठी निवडणूक इतक्या कौशल्यपणे सांभाळली. जवळपास १०० कोटी मतदार, लाखो वोटिंग मशीन, मोठी यंत्रणा आणि निवडणूक कर्मचार्‍यांनी एवढ्या गरमीत आपले कर्तव्य निभावले, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाचेही कौतुक केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech