मुंबई – मुंबईतील लोकसभेच्या ६ जागांसाठी झालेल्या रोमहर्षक निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीने मुंबईत जोरदार मुसंडी मारत भाजपच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीचा धुव्वा उडवला आहे. दोन्ही काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीने मुंबईत ४-२ ने महायुतीवर मात केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईतील ३ जागांवर आपला भगवा फडकवला आहे. या यशातून ठाकरे गटाने मुंबईवरील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, मुंबईतील झंझावाती रोड शो करूनही महायुती विशेषतः भाजपला मुंबईकरांनी नाकारले आहे. भाजपला केवळ मुंबई उत्तर तर शिवसेनेला मुंबई उत्तर-दक्षिण या एकमेव जागेवर विजय मिळाला.