मुंबई – अठराव्या लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पाचवा आणि शेवटचा टप्पा 20 मे 2024 रोजी पार पडल्यानंतर तब्बल 15 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज (4 जून) मतमोजणी हाती घेऊन निकाल जाहीर झाला आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात पार पडलेल्या कोकण विभागातील मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळाले. तर एका जागेवर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळवता आला आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, कल्याण, ठाणे आणि रायगड मतदारसंघात ठाकरे गटाला महायुतीकडून पराभवाचा सामना करावा लागला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांतून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला गेल्याने किरण सामंत यांनी माघार घेतली आणि त्यानंतर भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. तर दुसरीकडे विनायक राऊत यांच्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून कुडाळच्या वैभव नाईक यांनी अस्तित्वाची लढाई आणि राणेंशी राजकीय वैरामुळे सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र कोकणच्या राजकारणातील मुरब्बी राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले. यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं होतं. त्यामुळे राजन विचार यांच्यावर विश्वास दाखवत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची संधी दिली. तर दुसरीकडे महायुतीकडून ठाण्याची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुटली. एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना तिकीट दिले. मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे, तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदे गट उद्धव ठाकरेंविरुद्ध पहिली निवडणूक लढवत होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा पराभव करत विजय निश्चित केला.
एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच घोषणा केली होती. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांना शिंदे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली. याशिवाय ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी घोषित केल्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची लढत होईल, असे वाटले होते. मात्र श्रीकांत शिंदे यांनी 2 लाखांहून अधिक मतांनी विजयी मिळवत एकतर्फी निवडणूक जिंकली. त्यामुळे असे म्हणावे लागेल की, नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांचा गड राखला, तर श्रीकांत शिंदे यांनी त्यांची जागा राखण्यात यश मिळवले आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघातून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 10 उमेदवार रिंगणात होते. मात्र भाजपाचे हेमंत सवरा, बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील आणि महाविकास आघाडीच्या भारती कामडी या तीन पक्षात प्रमुख लढत पार पडली. महायुतीचे विद्यामान खासदार राजेंद्र गावित यांना बहुजन विकास आघाडीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोध दर्शविला होता. यानंतर महायुतीकडून राजेंद्र गावित यांचे तिकीट कापत हेमंत सवरा यांना उमेदवारी जाहीर केली. तर बहुजन विकास आघाडीने आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी घोषित करत निवडणुकीत मोठ्या ताकदीने उडी घेतली. तसेच शिवसेना ठाकरे गटाने भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची बनली होती. मात्र 29 व्या फेरीनंतर डॉ. हेमंत विष्णू सावरा यांनी 1,83,386 + पोस्टल मतांच्या (1036) मदतीने 1 लाख 84 हजार 422 मतांनी विजय मिळवला.
रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्या महत्त्वपूर्ण लढत पार पडली. अलिबागमधील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या मतमोजणीच्या एकूण 29 फेऱ्यानंतर सुनील तटकरे हे विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा 82 हजार 784 मतांनी पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत महायुतीचे सुनील तटकरे यांना 5 लाख 8 हजार 352 मते मिळाली, तर त्यांचे महाविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी अनंत गीते यांना 4 लाख 25 हजार 568 मते मिळाली. तटकरेंच्या विजयानंतर अलिबागसह रोहा, श्रीवर्धनमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार विजयी जल्लोष केला. तर सुनील तटकरे यांचा विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी भंडारा उधळण करून आनंद व्यक्त केला.
यंदाच्या निवडणुकीत भाजपाकडून कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती. कारण याआधी त्यांनी 2014 आणि 2019 साली मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यामुळे भाजपाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. तर दुसरीकडे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भिवंडीतील स्थानिक नेते सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी दिली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून निवडणूक लढताना बाळ्या मामा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर 10 वर्षांना पुन्हा एकदा कपिल पाटील आणि बाळ्या मामा हे आमनेसामने होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र बाळ्या मामा यांनी 60 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे कपिल पाटील यांना भिवंडी मतदारसंघातून विजयी हॅट्रिक करता आलेली नाही.