अपेक्षित निकाल; बारामतीचा गड पवारांनी राखला

0

पुणे – लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आणि सगळेच दिग्गज श्वास रोखून बसले होते. दोन पक्ष फुटल्याने राज्यातील बारामतीची लढत ही हाय व्होल्टेज होती. इथे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. तर त्यांच्यासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. पवार विरुद्ध पवार अशी ही लढत असल्याने राज्यासह देशाचे लक्ष या लढतीकडे लागले होते. आणि मंगळवारी लागलेल्या निकालानुसार अपेक्षेप्रमाणे पवारांनी हा गड राखला. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढतीत अखेर सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली.

मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली आणि फिर एक बार मोदी सरकार येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महायुतीचे सगळे अंदाज मतदारांनी फोल ठरवले. मविआच्या पारड्यात मतं टाकत राज्यात मतदारांनी मविआला भरघोस यश मिळवून दिले. मतमोजणी सुरू झाल्यापासूनच निकालाची धाकधूक होती. मात्र, सुरुवातीच्या काळातील आकडे हे महायुतीसाठी चिंताजनक तर मविआसाठी दिलासादायक होते. यावेळी राज्यात बारामती, शिरूर, पुणे, सातारा, कोल्हापूर अशा अनेक महत्त्वाच्या लढती होत्या. आणि यातील पुणे, सातारा वगळता अन्य जागांवर मविआला यश मिळाले आहे.

बारामतीची लोकसभा निवडणूक ही प्रामुख्याने विकास आणि भावनिकतेच्या मुद्द्यांवर जास्त लढली गेली. कुटुंबातीलच लढत असल्याने तिला जास्त महत्त्व होतेच पण अजित पवारांनी देखील आपली सगळी ताकद पणाला लावत या मतदासंघावर लक्ष केंद्रित केलं होतं. तर लेकीसाठी शरद पवार यांनी देखील वैयक्तिकरित्या या मतदारसंघात लक्ष घालत 8 सभा घेतल्या. याचाच परिणाम म्हणून बारामतीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या असल्या तरी नणंद – भावजयीतील ही लढत अटीतटीची झाली.

अजित पवारांनी सातत्याने विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, विकासाबाबत बोलताना देखील शरद पवार आणि सुप्रिया सुळे हेच त्यांच्या निशाण्यावर होते. तुमच्यासमोर बोलताना कोणी भावनिक होतील, मात्र भावनिक न होता विकासाला प्राधान्य द्या, असा प्रचार अजित पवार नेहमीच करत होते. त्यातच निवडणुकीत पवार कुटुंबीय विरुद्ध अजित पवार असंच चित्र दिसलं. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि पुतणे युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या विरोधात प्रचारात दिसले. तर सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात रोहित पवारांनी देखील महत्त्वाची भूमिका निभावली. आतापर्यंत लेकीला निवडून दिलंत आता सुनेला निवडून द्या, असे आवाहनही अजित पवार यांनी प्रचारात केले होते. मात्र, या सगळ्यानंतरही अखेर या लढतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech