जालना – जालना हा मराठवाड्यातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. इथे भाजपाचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे मैदानात होते. जालनामध्ये 1999 पासून या लोकसभा मतदार संघावर भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं वर्चस्व कायम होतं. दानवे हे सलग 5 टर्म जालन्याचे खासदार राहिले आहेत. परंतु आता मात्र भाजपाचा हा 35 वर्षांचा अभेद्य किल्ला ढासळला आहे. काँग्रेसचे उमदेवार कल्याण काळे यांनी जवळपास 90 हजार मतांच्या फरकाने रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव केला आहे.
जालना हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. याचा फटका रावसाहेब दानवेंना बसलेला दिसतो. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना तीव्र विरोध होता, त्याचाच परिणाम म्हणून की काय, भाजपानं 35 वर्ष जिथे आपली सत्ता कायम राखली होती, ती आता गमावली आहे.
2009 मध्ये जालना मतदार संघात रावसाहेब दानवे विरुध्द काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात कडवी लढत झाली होती. त्या लढतीत दानवे फक्त 8 हजारांनी विजयी झाले होते. गेल्या दोन निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा घेत रावसाहेब दानवे विजयी झाले होते. परंतु आता मात्र, जनतेनं काँग्रेसला स्पष्ट कौल दिला आहे. जालना लोकसभा मतदार संघात रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार डॉ कल्याण काळे यांच्यात जरी दुरंगी लढत होती. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक असलेल्या मराठा सामाजाने काँग्रेसच्या पारड्यात मत टाकलं आहे.