रायगडला पुन्हा तटकरेंचीच तटबंदी

0

अलिबाग – रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा ८२ हजार ७८४ मतांनी पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत महायुतीचे सुनील तटकरे यांना ५ लाख ८ हजार ३५२ मते मिळाली तर त्यांचे महाविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी अनंत गीते यांना ४ लाख २५ हजार ५६८ मते मिळाली. तटकरेंच्या विजयानंतर अलिबागसह रोहा, श्रीवर्धनमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार विजयी जल्लोष केला.

अलिबागमधील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात मतदानमोजणी झाली. मतमोजणीच्या एकूण २९ फेऱ्या झाल्या. त्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत अनंत गीते यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर सुनील तटकरे यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकून ठेवली. रायगड लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यानंतर भाजपमधून इच्छुक असलेले धैर्यशील पाटील नाराज झाल्याची खूप चर्चा होती. त्यामुळे त्याची झळ तटकरेंना बसेल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात तटकरेंच्या मतदानात वाढ झालेली दिसली. सुनील तटकरे यांनी रायगड मतदासंघातून २०१४, २०१९ आणि आता २०२४ ची निवडणूक लढवली. प्रत्येकवेळी त्यांच्या मतांमध्ये वाढ झाली आहे.

सुनील तटकरे यांचा विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी भंडारा उधळण करून आनंद व्यक्त केला. त्यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, पेणचे आमदार रवींद्र पाटील, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, धैर्यशील पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी किशन जावळे याच्या हस्ते सुनील तटकरे यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech