पनवेल – मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यामुळे ते तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संसदेत प्रवेश करणार आहेत. श्रीरंग बारणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांचा ९६ हजार ६१५ मतांनी पराभव केला.
खासदार श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात सरळ लढत झाली होती. मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच बारणे यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम होती. श्रीरंग बारणे यांना ६ लाख ९२ हजार ८३२ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी संजोग वाघेरे-पाटील यांना ५ लाख ९६ हजार २१७ मते मिळाली.
विजय दृष्टिपथात असल्याचा अंदाज आल्यानंतर श्रीरंग बारणे त्यांच्या समर्थकांसह बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर आले. तेव्हा त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष करत घोषणाबाजी केली. महायुतीचा विजय असो, झाली रे झाली हॅट्ट्रिक झाली, घासून नाही ठासून आलो अशा घोषणा समर्थकांनी दिल्या. महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी गुलाल उधळत, फटाके वाजवत आनंद व्यक्त केला.