औंरगाबाद – लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंत आलेले निकाल हे अत्यंत धक्कादायक आहेत. काही ठिकाणी हॉट सिट असलेल्या जागाही सिटींग खासदार गमावताना दिसत आहेत. असाच काहीसा निकाल औरंगाबादमधूनही समोर आला आहे. या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होती. इथे ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाली होती. तर शिंदे गटानं संदीपान भुमरेंना संधी दिली होती आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असल्यानं या मतदार संघात इम्तियाज जलील पुन्हा बाजी मारतील, असं म्हटलं जात असतानाच, एकदम धक्कादायक निकाल समोर आला आहे. लोकांनी शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरेंना कौल दिला आहे. जवळपास 1 लाख मतांच्या आघाडीने संदीपान भुमरेंनी आघाडी घेतली आहे.
महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमधील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे औरंगाबाद. या जिल्ह्यात आठ मतदारसंघ आहेत. औरंगाबादमध्ये तिरंगी लढत होती. हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 1999 पासून या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो मात्र असं असताना 2019 ला इथे ए्मआयए्मचे इम्तियाज जलील यांनी काही मतांच्या फरकाने शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. चंद्रकांत खैरे हे 1999 पासून सलग चार निवडणुकीत विजयी झाले आहेत. आता या मतदारसंघात खैरेंचे जुने सहकारी सांदिपान भुमरेंनी बाजी मारली आहे.
औरंगाबादच्या जनतेनं यावेळी शिंदेंच्या शिवसेनेला कौल दिला आहे. तर विद्यमान खासदार असणाऱ्या इम्तियाज जलील यांचाही पराभव झाला आहे. आतापर्यंत कोणतीही निवडणूक हरले नाहीत अशी जलील यांची ओळख होती. मात्र आज आलेला निकाल हा त्यांच्यासाठी धक्कादायक आहे.