अहमदनगर- अहमदनगरच्या पारनेरमधील बसस्थानकासमोर महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार निलेश लंके यांचे सहकारी राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. १० ते १२ जणांनी झावरे यांच्यावर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात राहुल झावरे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी राहुल झावरे यांची गाडीदेखील फोडली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल झावरे यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे निलेश लंके यांचे विरोधक उमेदवार सुजय विखे यांच्या समर्थकांनी राहुल झावरे यांच्यावर हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राहुल झावरे यांच्यावरील हल्ल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर पारनेर पोलीस ठाण्यात लंकेचे समर्थक जमले होते. हल्लेखोरांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी निलेश लंके यांच्या समर्थकांनी केली आहे. सुजय विखे पाटील यांचे समर्थक विजय औटी यांनी राहुल झावरे यांना मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे. राजेंद्र फाळके यांनी सांगितले की, विखे पाटलांमध्ये पराजय पचवण्याची ताकद नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून राहुल झावरे यांना मारहाण करण्यात आली. याबाबत गृहमंत्र्यांनी निःपक्षपातीपणे चौकशी करून कारवाई करावी. दोषींवर कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल.