विखेंच्या त्रासाला कंटाळून भाजपा नेत्यांची लंकेंना मदत

0

अहमदनगर – सुजय विखे यांच्या त्रासाला कंटाळून भाजपाच्या अनेक नेत्यांनी निलेश लंके यांना मदत केली, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे. निलेश लंके यांच्या लोकसभेच्या विजयानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राजेंद्र फाळके यांनी हा गौप्यस्फोट केला. यावेळी काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार, आप यांच्यासह सहयोगी पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पत्रकार परिषदेत राजेंद्र फाळके यांनी पालकमंत्र्यांनी पक्षशिस्त दाखवावी अशीदेखील मागणी केली.

राजेंद्र फाळके यांनी सांगितले की, अनेक भाजपा नेत्यांनी सुजय विखे यांच्या त्रासाला कंटाळून निलेश लंके यांना मदत केली आहे. सामान्यांना त्रास देण्याचे काम पालकमंत्र्यांकडून झाले आहे. आम्ही अतिक्रमणांच्या विरोधातच आहोत. मात्र सुप्यासारखी अतिक्रमणे जिल्हाभरात आहेत. सामान्यांना त्रास दिल्यावर त्यांच्यातून उद्रेक होतो, हे भाजपाच्या काही जणांनी दाखवून दिले आहे. त्यांनी लंके यांना साथ दिली आहे. आम्ही विजयाने हुरळून जाणार नाही, पण त्यांना पराभव पचवता येईल की नाही हा प्रश्न आहे. यापुढे त्यांनी सामान्यांना त्रास देऊ नये. पक्षशिस्त महत्वाची मानून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी जबाबदारी देण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनीही अशी पक्षशिस्त व नैतिकता दाखवावी. तुतारीशी साधर्म्य असलेले पिपाणी चिन्ह मिळालेल्या उमेदवाराला नीलेश लंके यांची ४४ हजार ५०० मते मिळाली. १७ पेक्षा जास्त उमेदवार असल्याने दोन ईव्हीएम मशीन होते. पहिल्या ईव्हीएमच्या दुसऱ्या क्रमांकावर लंके यांचे नाव होते. तर दुसऱ्या ईव्हीएमच्या दुसऱ्या क्रमांकावर तुतारी साधर्म्य असलेले चिन्ह असलेल्या उमेदवाराचे नाव होते. त्याला कोणीही ओळखत नाही. त्यामुळे त्याला मिळालेल्या मतांपैकी किमान ४० हजार मते लंके यांचीच आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech