प्रवासादरम्यान सुट्या पैशांची चिंता मिटली; एसटीमध्ये युपीआय प्रणालीला भरघोस प्रतिसाद

0

मुंबई – एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्या पैशांची चिंता करण्याची गरज नाही. कारण एसटी महामंडळाने काही महिन्यांपूर्वी एक पाऊल पुढे टाकत प्रवाशांना ‘युपीआय’ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. सर्व वाहकांसाठी ॲण्ड्राईड तिकीट इश्यू मशिन्स (ETIM) नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकिट काढता येते. यामुळे जानेवारी 2024 ते मे 2024 अखेर 14 लाख 32 हजार तिकीटांची विक्री झाली असून यातून गेल्या 5महिन्यात 35 कोटी 87 लाख 15 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

निश्चलनीकरणाच्या (Cashless) दृष्टीकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे यासारख्या युपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली होती. वाहकाच्या ॲड्राईड तिकीट मशीनवर असलेल्या क्युआर कोडद्वारे प्रवाशांना तिकीटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य झाले. अर्थात, प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत तसेच, सुट्या पैशासाठी वाहकासोबत होणारा वाद असे प्रश्न कायमचे मिटले आहेत.

सहज आणि सुलभ तिकीट प्रणालीला प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला असून जानेवारी 2024 मध्ये प्रतिदिन केवळ 3 हजार 500 तिकीटे युपीआयव्दारे काढली जात होती. त्यामध्ये मे 2024 मध्ये पाचपट वाढ होऊन प्रतिदिन 20 हजार 400 तिकीटे सरासरी काढली जात आहेत. अर्थात, युपीआय पेमेंटद्वारे महामंडळाच्या खात्यावर पैसे जमा होण्याचे प्रमाण देखील वाढले असून ते जानेवारी 2024 मध्ये प्रतिदिन 10 लाख रुपये होते, आता मे 2024 मध्ये 45 लाख रूपये प्रतिदिन झाले आहे.

प्रवाशांनी प्रवासादरम्यान नेहमी वाहकाकडे युपीआय तिकीटाची मागणी करावी जेणेकरून सुट्या पैशावरून होणारे वादविवाद टाळले जातील. साहजिकच आपला प्रवास सुखकर आणि समाधानकारक होईल. युपीआय पेमेंटद्वारे क्युआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली असून जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech