मुंबई़़ – राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) असलेल्या खटल्यांसंदर्भातील SAFEMAच्या अपीलीय न्यायाधिकरणाने प्रफुल पटेल यांच्या अनेक फ्लॅटवरील जप्ती हटविण्याचे आदेश दिले आहेत. 3 जूनला हे आदेश दिले असून मुंबईतील वरळीच्या सीजे हाऊसमधील 12व्या ते 15व्या मजल्यावरील अनेक फ्लॅटचा ताबा प्रफुल पटेल यांना परत मिळणार आहे. या फ्लॅट्सची किंमत 180 कोटी रुपयांहून अधिक आहे.
एअर इंडियाचे विमान भाडेतत्त्वावर देण्याच्या 840 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा तपास सीबीआय बंद केला. गैरप्रकाराचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगत सीबीआयने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये (यूपीए) नागरी विमान वाहतूकमंत्री असलेले प्रफुल पटेल आणि एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अनियमिततेचे आरोप होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने 2017मध्ये याचा तपास सुरू केला होता. त्यापाठोपाठ आता फ्लॅट्सवरील जप्ती उठवून त्यांना आणखी एक दिलासा देण्यात आला आहे.
ईडीने 2022मध्ये प्रफुल पटेल, त्यांची पत्नी वर्षा तसेच त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीच्या सीजे हाऊसमधील किमान सात फ्लॅट्सवर जप्तीची कारवाई केली होती. ड्रगमाफिया इक्बाल मिर्ची याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीसमवेत बेकायदेशीरपणे व्यवहार करून पटेल यांनी ही मालमत्ता मिळवल्याचा आरोप ईडीने केला होता. निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी म्हणजे, सोमवारी अपीलीय न्यायाधीकरणाने ही जप्तीची कारवाई रद्द केली होती.
ही मालमत्ता मनी लाँड्रिंगशी तसेच, इक्बाल मिर्चीशी संबंधित नसल्याने प्रफुल पटेल यांच्याविरुद्ध ईडीने केलेली ही कारवाई बेकायदेशीर आहे. सीजे हाऊसमधील हाजरा मेमन आणि तिच्या दोन मुलांची 14,000 चौरस फूट क्षेत्रफळाची मालमत्ता स्वतंत्रपणे जप्त करण्यात आली होती. पण त्याबरोबर पटेल यांच्या मालकीच्या अन्य 14,000 चौरस फूटाची मालमत्ता या गुन्ह्याचा भाग नसल्याने ती जप्त करण्याची आवश्यकता नव्हती, असेही न्यायाधिकरणाने म्हटले आहे.
सीजे हाऊस ज्यावर बांधण्यात आले आहे, ती मालमत्ता हाजरा मेमनकडून खरेदी केली होती आणि त्याच सीजे हाऊसमधील 14,000 चौरस फूट मालमत्तेची मालकी दिली होती, असा आरोप ईडीने या फ्लॅट्सवर जप्तीची कारवाई करताना केला होता. हाजरा तसेच आसिफ आणि जुनैद या तिच्या दोन मुलांना ईडीने आर्थिक गुन्ह्यातील फरार घोषित केले होते आणि त्याचप्रकरणता सीजे हाऊसमधील पटेल यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली होती.