नवी दिल्ली – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेता बनवण्याच्या प्रस्तावाला आज, शनिवारी मंजुरी देण्यात आली. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत राहुल यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सीडब्लूसी बैठकीनंतर काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी म्हणाले की, राहुल गांधींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते नक्कीच व्हायला हवे. आमच्या कार्यकारिणीची ही विनंती असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी निर्भय आणि धैर्यवान आहेत. यासोबतच काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचे नेते के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, आता काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन सुरू झाले आहे.
काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची विनंती केली आहे. संसदेत या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी हे सर्वात योग्य व्यक्ती आहेत असे वेणुगोपाल यांनी सांगितले. तर राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आणि देशातील जनतेचा आवाज व्हावे ही आमच्या कार्यकारिणीची इच्छा आहे. त्यांच्या जोरावर त्यांना सत्य जनतेसमोर आणण्याचे बळ मिळेल असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला.