रायपूर- छत्तीसगडमधील नारायणपूर-दंतेवाडा सीमा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये ७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले. तर या घटनेत डीआरजीचे ३ जवानही जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त केला.
छत्तीसगडच्या पूर्व बस्तर विभागातील एका गावात अनेक नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसरात शोध मोहिम सुरु केली. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ७ नक्षलवादी ठार झाले. नक्षलवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहेत. डीआरजी पथक आणि ४५ व्या कॉर्प्स आयटीबीपीच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.