फडणवीसांच्या निकटवर्तीय खासदाराला लॉटरी; मोदी मंत्रिमंडळात होणार एन्ट्री

0

नवी दिल्ली – दिल्लीत एनडीए सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी संपन्न होईल. मोदींच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन जाऊ लागले आहेत. राज्यातील सहा खासदारांना आतापर्यंत फोन गेले आहेत. यातील चार जण भाजपचे आहेत. यातील एक नावामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पियूष गोयल, नितीन गडकरी, रक्षा खडसेंना पंतप्रधान कार्यालयातून सर्वात आधी फोन आले. गोयल आणि गडकरींनी याआधीच्या मंत्रिमंडळांमध्ये महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळातला समावेश निश्चित मानला जात होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. रावेरमधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या रक्षा खडसेंना पंतप्रधान कार्यालयाकडून निमंत्रण आलेलं आहे. त्यामुख खडसे या मोदींच्या मंत्रिमंडळातील नवा चेहरा असतील.

नगरसेवक, महापौर ते खासदार असा प्रवास करणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांनादेखील पीएमओमधून बोलावणं आलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले मोहोळ गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. त्यांना केंद्रीय मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मोहोळ पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी पुणे मतदारसंघात काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांचा पराभव केला. पश्चिम महाराष्ट्रात यंदा भाजपला केवळ दोन जागांवर यश मिळालं. माढा, सोलापूर, पुण्यात फडणवीसांच्या निकटवर्तीयांना तिकीट मिळालं होतं. माढ्यात रणजीतसिंह निंबाळकर, सोलापुरात राम सातपुतेंना पराभव पत्करावा लागला. पण मोहोळ यांनी पुण्यातून विजय मिळवला आणि भाजपचा बालेकिल्ला राखला. भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याची जागा रिक्त झाली होती. भाजपचा बालेकिल्ला कायम राखण्याची कामगिरी मोहोळ यांनी केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech