मुंबई – ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांना राष्ट्रपतींच्या वतीने राज्य शासनामार्फत पद्म भूषण पुरस्कार प्रदान करून आज सन्मानित करण्यात आले. राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितिन करीर तसेच अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी श्री. शर्मा यांच्या वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. त्याचबरोबर शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे, प्यारेलाल शर्मा यांच्या पत्नी सुनीला आणि कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते. प्यारेलाल शर्मा यांनी यावेळी केंद्र सरकारसह राज्य शासनाचे आभार मानले.
या वर्षीचा पद्म पुरस्कार प्रदान सोहळा 9 मे 2024 रोजी राष्ट्रपती भवन येथे झाला. या सोहळ्यामध्ये श्री. शर्मा उपस्थित राहू शकले नसल्याने राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी यांच्या हस्ते श्री. शर्मा यांच्या निवासस्थानी जाऊन आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.