अयोध्या – उत्तर भारतात ज्येष्ठ महिन्यातल्या पहिल्या मंगळवारी रामभक्त हनुमानाच्या पुजनाचे विशेष महत्त्व असून त्यानिमित्ताने आज अयोध्येच्या हनुमान गढीत भक्तांची एकच गर्दी झाली आहे. अयोध्येतील हनुमान गढीतील हनुमानाच्या दर्शनाला रामाच्या दर्शनाइतके महत्त्व आहे. अयोध्येतील हनुमान गढी हे प्राचीन मंदिर असून त्याचा विस्तार अवधचा नबाब सराजुद्दोला याने केला होता.
उत्तर भारतात ज्येष्ठ महिन्यातील पहिला मंगळवार हा हनुमानाच्या भक्तीचा वार असतो. या निमित्ताने विविध मंदिरात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. हनुमान गढीतही हनुमान पूजन, हनुमान चालीसाचे वाचन व इतरही अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. उत्तर भारतात आज हनुमान गढीसह अनेक हनुमान मंदिरात भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
भाजपाकडून अयोध्येची जागा गेल्यानंतर अयोध्येविषयी समाजमाध्यमांवर विखारी प्रचार केला गेला. अयोध्येत भक्तांनी जावे पण तिथे काहीही विकत घेऊ नये, त्याचप्रमाणे अयोध्यावासीयांनी दगा दिला वगैरे अनेक गोष्टी पसरवण्यात आल्या. त्या साऱ्या अपप्रचाराला न जुमानता आज राम व हनुमान भक्तांनी अयोध्येत एकच गर्दी केली.