नवी दिल्ली – भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना एनडीएच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यात त्यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ ३० जून रोजी संपणार आहे. त्यामुळे भाजपकडून नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी काही नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर आहे. सुनील बन्सल, ओम माथूर, के लक्ष्मण यांची नावेही भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
जेपी नड्डा यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिली नसती तर नव्या अध्यक्षांचा शोध घेतला गेला नसता, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. जेपी नड्डा यांचा भाजप अध्यक्ष म्हणून कार्यकाळ ३० जून रोजी संपणार आहे. नड्डा यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे अध्यक्षपद एखाद्या मुरब्बी नेत्यांकडे जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे.