उद्धव ठाकरे पुन्हा नॉट रिचेबल, पटोलेंचा संपर्क होईना

0

मुंबई – लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाल्याने विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूकही एकत्र लढवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चालवला असला तरी अजूनही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. शिवसेनेने परस्पर तीन उमेदवार जाहीर करून टाकले आहेत. याबद्दल सौम्य शब्दात आपली नाराजी व्यक्त व्यक्त करताना, अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्यापूर्वी यावर निर्णय होईल, अशी आशा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होण्यापूर्वीच सांगली, दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती. परंतु वाद टाळण्यासाठी काँग्रेसने तडजोड केली. लोकसभा निवडणुकीत आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर पुढील निवडणुका अधिक समन्वयाने लढवण्याचे सांगितले गेले. पण शिवसेनेने निवडणूक होत असलेल्या विधानपरिषदेच्या चार पैकी तीन जागांवर आपले उमेदवार जाहीर करून टाकले आहेत. याबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नाराजी व्यक्त केली. कोकण, मुंबई व नाशिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघापैकी कोकण पदवीधर व नाशिकच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली होती. परंतु शिवसेनेने परस्पर कोकण, नाशिक व मुंबईचे उमेदवार जाहीर केले. विधान परिषद निवडणुकीचा निर्णय एकत्र बसून केल्यास महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे चांगले यश मिळू शकेल यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. आधी उद्धव ठाकरे यांना संपर्क केला तेव्हा ते परदेशात होते. आज मातोश्रीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech