बुलढाणा – संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी एकादशीसाठी शेगावातून पंढरपूरकडे रवाना झाली आहे. श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे ब्राम्हवृंदानच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रींच्या सेवधारी व्यवस्थापकीय विश्वस्थांच्या उपस्थितीत आज सकाळी ७ वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघाली. यावेळी भाविकांचा उत्साह द्विगुणीत झाला हाेता.
संत गजानन महाराज संस्थेच्या यंदा दिंडीचे हे ५५ वे वर्ष आहे. या दिंडीत ७०० वारकरी, २५० पताकाधारी, २५० टाळकरी, २०० सेवेकरी सहभागी झाले आहेत. पुढील एक महिना पायी प्रवास करून १५ जुलैला पालखी पंढरपूर येथे पोहोचेल. त्यानंतर सर्व वारकरी पंढरपुरात आषाढी उत्सवात सहभागी होतील. दरम्यान, आषाढी एकादशीसाठी राज्याच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येतात. आषाढी एकादशीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे २९ जूनला प्रस्थान होणार आहे. पंढरपुरात चार दिवसांच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपवून संत ज्ञानेश्वरांची पालखी २१ जुलैला परतीच्या प्रवासाला निघेल.