पुणे – पुणे विमानतळाच्या हिवाळी वेळापत्रकात पुण्याहून थेट बँकॉक आणि दोहासाठी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी यासाठी प्रस्ताव दिला असून, त्यात स्लॉटची मागणी केली आहे. पुणे विमानतळ स्लॉट देण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले जाते. स्लॉट मिळाल्यास ही विमानसेवा लवकरच सुरू होईल. ही सेवा हिवाळी वेळापत्रकात सुरू होण्याची शक्यता अधिक आहे.
पुण्याहून बँकॉकला विमानसेवा देण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने, तर दोहासाठी इंडिगो या विमान कंपन्यांनी प्रस्ताव दिला आहे. सध्या या प्रस्तावांवर हवाई मंत्रालयात विचार सुरू आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच दोहा व बँकॉक विमानतळावर स्लॉटसाठी चाचपणी केली जाईल. पुणे विमानतळ दोन्ही विमान कंपन्यांना स्लॉट देण्याबाबत सकारात्मक आहे. पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले की, याबाबत वरिष्ठ स्तरावरही चर्चा सुरू आहे. माझ्यापर्यंत अद्याप काही आलेले नाही. पुण्याहून नवीन शहरांना सेवा सुरू होण्यासाठी आम्ही नेहमीच सकारात्मक आहोत.
यापूर्वी पुण्याहून दोहासाठी विमानसेवा सुरू होती. मात्र, काही महिन्यांतच ती बंद झाली. मात्र, आता पुन्हा एकदा दोहाला जाणारी विमाने सुरू होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पुणे विमानतळावरून सध्या दुबई व सिंगापूर या दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहेत. हिवाळी वेळापत्रक सुरू होण्यास आणखी महिन्यांचा अवधी आहे. तोपर्यंत नवीन टर्मिनलदेखील प्रवाशांसाठी खुले होईल. नवीन टर्मिनलवरून विमानांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानांचा समावेश असण्याची शक्यता आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे हवाई वाहतूक राज्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी यात लक्ष घातल्यास पुणेकरांना थेट बँकॉक व दोहासाठी विमानसेवा उपलब्ध होईल, असे बोलले जाते.