सुरत – जगभरात कृत्रिम म्हणजेच प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांमुळे खऱ्याखुऱ्या हिऱ्यांच्या बाजारात मोठी उलथापालथ दिसून येत आहे. हिरे पॉलिश व पैलू पाडण्याचे काम करणाऱ्या कारखान्यांना त्याचा फटका बसत आहे. हिऱे व्यापाराचे केंद्र असलेल्या सुरत मध्ये हिऱ्याला पैलू पाडणाऱ्या एका कारखान्यातील ६०० कामगारांना गेल्या तीन महिन्याचा पगार मिळाला नाही . त्यासाठी त्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीमार करत त्यांना कंपनीसमोरुन हुसकावून लावले. कृत्रिम हिऱ्यांमुळे कामगारांवर ही वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे.
कृत्रिम हिऱ्यांच्या वाढत्या उलाढालीचा परिणाम सुरतच्या बाजारावर होत आहे. खऱ्या हिऱ्यांच्या किंमतीवर व आंतरराष्ट्रीय बाजारातील त्यांच्या विक्रीवरही मोठा परिणाम झाला आहे. त्यातच कृत्रिम हिऱ्यांच्या व्यवसायातील एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीने हिऱ्याच्या किंमतींमध्ये ३७ टक्के घट केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांच्या कृत्रिम हिऱ्यांची किंमत एका कॅरेटला ८०० डॉलर होती ती कमी करुन ५०० डॉलर प्रती कॅरेट करण्यात आली आहे. त्याचा मोठा फटका हा हिरे व्यवसायाला व त्याचबरोबर हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या लहान व्यवसायिकांना पडला असल्याचे सांगण्यात येत आहे. कृत्रिम हिऱ्यांच्या वाढत्या मागणीने खऱ्या हिऱ्यांचा व्यवसाय काळवंडल्याचे दिसून येत आहे.