राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी सलग तिसऱ्यांदा अजित डोवाल यांची नियुक्ती

0

– डॉ. पी.के. मिश्रा पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी कायम

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळाला सुरुवात केली. त्यानंतर आता अजित डोवाल यांचीही सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. तर डॉ. पी.के. मिश्रा हे पंतप्रधानांचे प्रधान सचिवपदी कायम राहतील. मिश्रा यांना त्यांच्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाणार आहे. तर अमित खरे आणि तरुण कपूर पुढील आदेशापर्यंत पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून राहतील.

डॉ. पीके मिश्रा आणि अजित डोवाल हे दोघेही पंतप्रधानांचे सर्वाधिक काळ प्रमुख सल्लागार राहिले आहेत. अजित डोवाल हे १९६८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते दहशतवादविरोधी आणि आण्विक विषयांमध्ये तज्ञ आहेत. डॉ. पीके मिश्रा हे १९७२ च्या बॅचचे निवृत्त अधिकारी आहेत. ते भारत सरकारच्या कृषी सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर मागील दोन टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. डॉ. मिश्रा आणि डोवाल हे दोघेही पंतप्रधान मोदींच्या सर्वात विश्वासू लोकांपैकी मानले जातात. कारण ते दोघेही २०१४ मध्ये पंतप्रधान होण्याआधीपासून त्यांच्याशी संबंधित आहेत.

अजित डोवाल यांनी पंजाबमध्ये आयबीचे ऑपरेशनल चीफ आणि काश्मीरमध्ये अतिरिक्त संचालक म्हणून काम केले आहे. त्यामुळे या दोन्ही संवेदनशील भागात पाकिस्तानच्या कारस्थानाचा त्यांना थेट अनुभव आहे. डोवाल यांना पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मध्य पूर्वेतील परिस्थिती आणि तिथल्या देशांशी असलेल्या संबंधांबाबत बराच अनुभव आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech