नैरोबी – भारतीय मूळ असलेल्या कावळ्यांमुळे केनिया हैराण झाला आहे. या देशात आगामी सहा महिन्यांत तब्बल १० लाख कावळे मारण्यात येणार आहेत. केनियात कावळ्यांचा उपद्रव वाढला आहे. कावळ्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेती, हॉटेल, पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, केनियन सरकारने घेतलेल्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
केनियन सरकारने कावळ्यांविरुद्ध एका प्रकारचे युद्धच छेडले आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत देशातील साधारण १० लाख कावळे मारण्याचे उद्दीष्ट सरकारतर्फे निश्चित करण्यात आले आहे. भारतीय वंशाचे कावळे हे केनियन परिसंस्थेत तेवढे महत्त्वाचे नाहीत, असे केनियन सरकारचे म्हणणे आहे. केनियम वाईल्डलाईफ सर्व्हिसच्या मते भारतीय कावळा हा परदेशी पक्षी आहे. तो मूळचा केनियन नाही. त्यामुळे किनारपट्टी भागातील शेतकरी आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी पक्ष डोकेदुखी ठरत आहे, अशी भूमिका मांडत केनियन सरकारने आगामी काही महिन्यांत १० लाख कावळे मारण्याचा निर्णय घेतला आहे.