सिंधुदुर्ग – भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी आज (15 जून) कोकणात घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक अत्यंत मोठं आणि काहीसं वाद निर्माण करणारं विधान केलं आहे. ‘कोकणातून मी शिवसेना संपवली.. पाच जिल्ह्यात शिवसेना कुठेच नाही..’ असं नारायण राणे म्हणाले. राणेंचा रोख हा जरी उद्धव ठाकरे यांच्यावर असला तरी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेच्या दृष्टीने देखील हे विधान महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, नारायण राणे यांच्या या टीकेला शिवसेना (UBT) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत राणेंवर जोरदार टीका केली आहे. ‘एवढं होतं तर नरेंद्र मोदींनी यांची औकात काय आहे ते ओळखलं.. म्हणून मंत्रिमंडळात स्थान पण दिलेलं नाही. त्यामुळे शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनाच राजकारणातून संपवण्याची ताकद शिवसेनेत आहे.’ असं प्रत्युत्तर विनायक राऊतांनी यावेळी दिलं आहे.