महाराष्ट्रातील पर्यटक सिक्कीममध्ये अडकले

0

लाचोंग – सिक्कीम येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे भूस्खलन झाल्याने रस्ते, घरांसह विजेचे पोल, झाडे कोसळून क्षणात होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे १५०० ते २००० पर्यटक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडकलेल्या पर्यटकांपैकी काही जणांशी फोनवरून संवाद साधला. या पर्यटकांची विचारपूस करून त्यांना धीर दिला.

दरम्यान, सिक्कीममध्ये अडकलेल्या या पर्यटकांची लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील संबंधित अधिका-यांना सूचना देण्यात आल्या. अडकलेल्या पर्यटकांपर्यंत ताबडतोब मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सध्या २८ जणांचा एक ग्रुप सिक्कीममधील लाचोंग या ठिकाणी अडकला असून, त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी स्वत: मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर प्रशासन कामाला लागले आहे. अडकलेल्या पर्यटकांना तातडीने मदत पुरवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. सिक्कीमध्ये अडकलेल्या २८ जणांना सीएमओ तसेच सिक्कीम सरकारकडून मदतीसाठी फोन आले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech