मुंबई – राज्यात पावसाळा सुरुवात झाला आहे तर काही भागात उष्णता जाणवत आहे. पाण्याची कमतरता असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाल्याच्या पिकांना मुबलक पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. श्रावण महिन्याआधीच भाज्यांचे दर वाढल्याने नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे.
सध्या घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमती ८० ते १०० रुपये किलो झाल्या आहेत. तर काही भाज्यांचे दर शंभरीपार गेले आहेत. बाजारात मागणीच्या तुलनेत फक्त ६० टक्केच भाजीपाल्याची आवक होते. त्यामुळे भाज्या महागल्या आहेत. पावसाळा लांबल्यामुळे अजून महिनाभर भाज्यांची कमतरता जाणवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोथिंबीरीची जुडी महागली आहे. याआधी हिरवा मसाला १० रुपयांना मिळायचा. तर तो आता २० रुपयांना मिळत आहे. कांद्याचे भावही दुप्पट झाले आहेत.