पाठीत वार केलात तर वाघनखे काढू, ठाकरेंचा इशारा
मुंबई – निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे आता भाजसोबत चर्चा करत असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. पण ज्यांनी आपल्या मातेसमान शिवसेना फोडली त्यांच्यासोबत जायचे का, आता त्यांची फाटली आहे, म्हणून या चर्चा सुरू केल्या असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह सोडून निवडणूक लढा, मग सांगतो यांना, असे आव्हानही त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिले. यावेळी त्यांनी तुम्ही प्रेमाने वागलात तर आम्ही प्रेमाने वागू, पाठीत वार केलात तर वाघनखे काढू, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. जमलेल्या माझ्या लढवय्या शिवसैनिकांनो! लोकसभा निवडणुकीच्या निकलानंतर पहिला आपला जाहीर कार्यक्रम आहे. शिवसेना म्हटल्यावर नवे चैतन्य आणि तरुणाई आली पाहिजे. मविआची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी मी धन्यवाद दिले. पण पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध या सगळ्या धर्मांचे आभार मानतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मी शून्य आहे, यशाचे धनी तुम्ही आहात. आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोप-यात कुठे जा, तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. पण आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फरक आहे. अहंकार जो मोदींमध्ये आहे. आता पुन्हा एकदा चर्चा करतात, उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार. ज्यांनी शिवसेना फोडली, मातेसमान शिवसेनेला फोडले, त्या नालायकांसोबत परत जायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.