मुंबई – शिवसेना वाढली ठाण्यात, कोकणात, संभाजीनगरमध्ये आणि महाराष्ट्रात. हे सर्व शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. हे बालेकिल्ले अबाधित राखले. कोणी म्हणाले ठाणे पडेल, कल्याण पडेल, पण आपण हे किल्ले २-२ लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकले. संभाजीनगर जिंकले, कोकणात एकही जागा ठाकरे गटाला मिळू शकली नाही. हा विजय घासून-पुसून नाही, तर ठासून मिळवला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापनदिन सोहळा वरळी डोम येथे पार पडला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. यावेळी निवडून आलेल्या सातही खासदारांचे स्वागत आणि सत्कार केला. हा बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. १९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. मराठी माणूस हा बाळासाहेबांचा केंद्र होता. शिवसेना पूर्ण देशात हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली. धनुष्यबाण पेलण्याची ताकद मनगटात लागते, ती आपल्या शिवसेनेत आहे. त्यामुळेच शिवसेनेला लोकांनी मतदान केले. मतांसाठी ऐवढी कसली लाचारी. बाळासांहेबंच्या विचाराला तिलांजली दिली. आपल्याला महायुती मजबूत करायची आहे. मागचे सर्व विसरुन पुढे न्यायचे आहे. महायुतीत मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे माझी जबाबदारी सर्वात जास्त आहे. तुमच्या साथीने मी ती जबाबदारी पार पाडेन, असे सर्वांना वचन देतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.