ठाणे – 15 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणून जाहीर करावा’ या मागणीला सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार साप्ताहिक विवेक चे माजी संपादक पद्मश्री रमेश पतंगे यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस आहे.डॉक्टर अब्दुल कलाम यांनी त्यांच्या शालेय जीवनामध्ये वृत्तपत्र विक्रीचे कष्टमय काम केले होते, व पुढे विद्वत्तेच्या जोरावरती त्यांनी भारताच्या अणुऊर्जेच्या क्षेत्रात दैदिप्यमान काम केले इतकेच नव्हे तर डॉक्टर अब्दुल कलाम हे पुढे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही प्रधान भारताचे राष्ट्रपती झाले. या देशातील प्रत्येक वृत्तपत्र विक्रेता व वितरण करणाऱ्या श्रमजीवींना डॉक्टर अब्दुल कलाम यांचे आयुष्य प्रेरणादायी वाटत असते आणि म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिवस’ म्हणून भारत सरकारने जाहीर करावा अशी मागणी ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीब्यूशन असोसिएशन च्या वतीने संघटनेचे सचिव मान्य दत्ता घाडगे यांनी केली आहे.
सन्माननीय रमेश पतंगे यांनी या मागणीला पाठिंबा देत विद्यमान केंद्र सरकारकडे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या मागणीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांच्या नावाने तयार केलेले निवेदन पद्मश्री रमेश पतंगे यांना देण्यात आले आहे. रमेश पतंगे हे भारतीय फिल्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य असून त्यांनी पन्नासहून अधिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे.पद्मश्री रमेश पतंगे यांनी ही मागणी अतिशय उचित आहे असे मत या संदर्भातील निवेदन स्वीकारताना व्यक्त केले आहे. निवेदन देताना संघटनेचे श्री. दीपक गवळी घाटकोपर प्रदीप बिडलान ठाणे व विवेक ईसामे ठाणे हे पदाधिकारी उपस्थित होते.