नवी दिल्ली – कार्यालयात उशिरा येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांवर आता नियमाचा बडगा उगारला जाणार आहे. जे कर्मचारी कार्यालयीन वेळेपेक्षा पंधरा मिनिटे उशिरा येतील त्यांचा अर्धा दिवस कापला जाणार आहे.
देशातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यासाठी सकाळी ९ ते संध्याकाळी साडेपाच अशी कामाची वेळ आहे. अनेकदा सरकारी बाबू हे आरामात आपल्या कार्यालयात येतात. त्याचप्रमाणे कार्यालयीन वेळेच्या आधीही कार्यालयाबाहेर पडतात. यामुळे केंद्र सरकारने आता याबाबतीत आधीपासून असलेल्या नियमांची सरकारी कठोरपणे अंमलबाजवणी करणार आहे. कोरोनाकाळात बंद करण्यात आलेली बायोमेट्रिक हजेरीही अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारच्या या नियमाविरोधात काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही बरेच वेळा उशिरापर्यंत कार्यालयात असतो. कधी कधी कार्यालयीन काम घरीही घेऊन जातो. त्यामुळे या नियमाचा आम्हाला दुहेरी फटका बसेल. ज्यांना कामानिमित्त कार्यालयाच्या बाहेर जावे लागते, त्यांनाही या नियमाचा फटका पडणार असल्याचेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.