अमरावती – आंध्र प्रदेशात सत्ता परिवर्तन झाले आहे. माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची सत्ता गेल्यानंतर, तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी)प्रमुख चंद्राबाबू नायडू सत्तेवर आले आहेत. मात्र, सत्ता परिवर्तन झाल्यानंतरही येथे सूडाचे राजकारण सुरूच आहे. आता येथे विजयवाडा येथील ताडेपल्ले जिल्ह्यातील युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पक्षाचे (वायएसआरसीपी) कार्यालय शनिवारी सकाळी जमीनदोस्त करण्यात आले. हे कार्यालय पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. यानंतर, आता हे सुडाचे राजकारण असल्याचे वायएसआरसीपीने म्हटले आहे.
ही इमारत गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्ली सर्कलमधील सीतानगरमच्या बोट यार्ड परिसरात आर. एस. क्रमांक २०२-ए-१ मध्ये ८७०.४० चौरस मीटरच्या कथितरित्या बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या जमिनीवर होती. वायएसआरसीपीने म्हटले आहे की, टीडीपी सुडाचे राजकारण करत आहे. वायएसआरसीपीने उच्च न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला आहे असे असतानाही कार्यालय पाडण्यात आले आहे. न्यायालयाने कुठल्याही प्रकराचे पाडकाम थांबविण्याचे आदेश दिले होते. ही कारवाई म्हणजे, राज्याच्या इतिहासात एखाद्या पक्ष कार्यालयाला पाडण्याची पहिलीच घटना आहे. सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारस बुलडोझरच्या सहाय्याने इमारत पाडण्यात आली.