बर्न – भारतीय वंशाचे उद्योगपती आणि ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंबियांची स्वित्झर्लंडच्या न्यायालयाने घरातील नोकरांचा छळ केल्यासंबंधीच्या आरोपातून दुसऱ्याच दिवशी मुक्तता केली. २१ जून रोजी न्यायालयाने हिंदुजा कुटुंबियांना दोषी ठरवून चार ते साडेचार वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र संबंधित नोकरांनी आरोप मागे घेतल्याने दुसऱ्याच दिवशी हिंदुजा कुटुंबियांची निर्दोष मुक्तता केली.
उद्योगपती प्रकाश हिंदुजा आणि त्यांची पत्नी कमल हिंदुजा यांना साडेचार वर्षांची तर त्यांचा मुलगा अजय आणि सून नम्रता यांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले नव्हते. हिंदुजा कुटुंबियांनी या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
उच्च न्यायालयात संबंधित नोकरांनी आम्हाला न समजलेल्या जबाबांवर स्वाक्षरी घेऊन आमची दिशाभूल करण्यात आली, अशी साक्ष दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाने हिंदुजा कुटुंबियांची तत्काळ निर्दोष मुक्तता केली. भारतातून काही जणांना स्वित्झरर्लंडमध्ये बेकायदेशीर आणणे, त्यांना घर कामागार म्हणून राबवून घेताना त्यांचा छळ करण्यात आला, असे आरोप हिंदुजा कुटुंबियांवर ठेवण्यात आले होते.