आकाश आनंद असणार मायावतींचा उत्तराधिकारी

0

लखनौ – उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी पुन्हा एकदा आपला भाचा, आकाश आनंद यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले आहे. याशिवाय, त्यांची पुन्हा एकदा बसपाच्या राष्ट्रीय समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. मायावतींनी रविवारी लखनौमध्ये बसपच्या सर्व राज्य प्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली, ज्यामध्ये आकाश आनंददेखील उपस्थित होता. या बैठकीत आकाश यांना पुन्हा एकदा उत्तराधिकारी घोषित करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींनी भाचा आकाश आनंद यांना उत्तराधिकारी घोषित केले होते. तसेच, त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकपदी निवड करण्यात आली. यानंतर लोकसभा निवडणुकीदरम्यान आकाश आनंद बसपाच्या अनेक प्रचारसभांमध्ये अतिशय आक्रमकपणे भाषणे देत होते. अशाच एका भाषणात त्यांनी भाजपला दहशतवादी पक्ष म्हटले. यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला होता. यानंतर मायावतींनी आकाशला बसपच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरुन हटवल्याची घोषणा केली. आकाशला अजून परिपक्व व्हायचे आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले होते.

येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशातील १० जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. बसपाने यापूर्वी कधीही पोटनिवडणूक लढवली नाही, मात्र यंदा मायावतींनी पोटनिवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आकाश आनंद यांना पुन्हा एकदा उत्ताधिकारी म्हणून घोषित केले असून त्यांची राष्ट्रीय समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळेच आता उत्तर प्रदेशची जबाबदारी पुन्हा एकदा आकाश आनंद यांच्या खांद्यावर आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech