अयोध्या – अयोध्येतील हनुमानगढी मंदिराचे मुख्य पुजारी राजू दास यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. जिल्हा भाजपा पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत अधिकाऱ्याबरोबर वाद घातल्यामुळे ही सुरक्षा काढण्यात आली, असे म्हटले जात आहे. राजू दास यांच्या विरोधात व्यापारी व नागरिकांना धमकावल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ते आपल्या सुरक्षाव्यवस्थेचा गैरवापर करत असल्याच्याही अनेक तक्रारी आल्यामुळे सुरक्षा काढून टाकल्याची माहिती अयोध्येचे जिल्हा न्यायदंडाधिकारी नितीश कुमार यांनी दिली आहे.
फैजाबाद- अयोध्या लोकसभा मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला. या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मंत्री जय वीर सिंग व सुर्या प्रताप शाही यांनी एक बैठक बोलावली होती. यावेळी अयोध्येचे महापौर गिरीश पाती त्रिपाठीही उपस्थित होते. याच बैठकीत राजू दास यांचा भाजपा पदाधिकाऱ्यांबरोबर वाद झाला. त्यांनी जिल्हा दंडाधिकारी कुमार व पोलिस निरिक्षक राज करण नायर यांच्यामुळे हा पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केला. या वादानंतरच त्यांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या पोलिसाला हटवण्यात आले आहे.