इस्रायलच्या उत्तरेकडील सीमेवरही युद्धाचे सावट

0

बैरूत – इस्रायलच्या उत्तरेकडील सीमेवर युद्धाचे सावट दिसू लागले आहे. लेबनॉनमधील हिज्बुल्ला ही दहशतवादी संघटना आणि इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे युद्धात रूपांतर झाल्यास इराणचे पाठबळ असलेल्या सशस्त्र गटांमधील हजारो दहशतवादी लेबनॉनमध्ये येण्यास तयार असल्याचा इशारा इराणचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी दिला आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात इस्राईल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासूनच इस्राईलच्या उत्तर सीमेवर असलेल्या लेबनॉनमधील हिज्बुल्लाने हमासला पाठिंबा जाहीर करत हल्ले सुरू केले होते. तेव्हापासून जवळपास रोजच इस्राईल आणि हिज्बुल्ला यांच्यात चकमकी व हल्ले सुरू आहेत. इस्राईलने काही दिवसांपूर्वी लेबनॉनमध्ये हल्ले करत हिज्बुल्लाच्या एका महत्त्वाच्या म्होरक्याला ठार मारले होते. त्यानंतर हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. हमास आणि हिज्बुल्ला या दोन्ही संघटनांना इराणचे पाठबळ आहे. त्यामुळे उत्तर सीमेवरील संघर्षाचे युद्धात रूपांतर झाल्यास इराणचे समर्थन असलेल्या सशस्त्र गटांमधील हजारो दहशतवादी हिज्बुल्लाला साथ देण्यासाठी लेबनॉनमध्ये येण्यास तयार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. हिज्बुल्लाचा एक म्होरक्या हसन नसरल्ला यानेही हेच जाहीर केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech