लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर निवडणुकांच्या तारखेवर बेटिंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ब्रिटनच्या जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निक मेसन हे हुजूर पक्षाचे डाटा अधिकारी आहेत त्यांच्यावर हा आरोप ठेवण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये २०२५ जानेवारीत निवडणुका नियोजित होत्या . मात्र सुनक सरकार विरोधात जनमत वाढत गेल्याने मुदतपूर्व निवडणूक घ्यायचे ठरत असताना तारखेबाबत बेटिंग सुरू होते.मात्र कोणत्याही चुकीच्या गोष्टीत त्यांचा सहभाग नाही अशी पाठराखण त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आली आहे. ब्रिटनच्या जुगार विरोधी समितीने हुजूर पक्षाच्या दोन उमेदवारांचीही चौकशी सुरु केली आहे. त्यांच्यावर निवडणूक तारखेच्याबाबत बेटींग केल्याचा आरोप आहे.
या आरोपामुळे ऋषी सुनक यांच्या प्रतिमेला तडे गेले आहेत. मजूर पक्षाला याचा फायदा होत असून मतदानोत्तर चाचण्यांमध्ये मजूर पक्षाला अधिक पसंती देण्यात आली आहे. या प्रकरणाबद्दल कोणतीही प्रतिक्रीया देण्यास हुजूर पक्षाच्या प्रवक्त्यांनी नकार दिला आहे. जुगार प्रतिबंधक समितीने दिलेल्या सूचनांनुसार कोणलाही प्रसारमाध्यमांशी बोलायला मनाई केली आहे असे त्यांनी सांगितले. या जुगार प्रतिबंधक समितीने आतापर्यंत कोणत्याही सदस्याचे नाव उघड केलेले नाही. जुगार प्रतिबंधक समितीनेही याबाबत काहीही सांगायला नकार दिला आहे. आपल्या पक्षाच्या नेत्याचे नाव या संदर्भात घेतल्याबद्दल ऋषी सुनक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.