नवी दिल्ली – बिहारचे सर्वाधिक अविश्वासू नेते नितीशकुमार यांनी आता भाजपातून दाखल झालेल्या संजय झा यांना ‘जदयू’च्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त केले. झा हे नितीशकुमार यांचे उत्तराधिकारी ठरतात किंवा नाही, ते येणारा काळच ठरवेल. नितीशकुमार कधी कोणती चाल खेळतील याचा नेम नाही. ‘गिरे तो भी टांग उपर’ प्रमाणे ते कोणाचीही साथ सोडून कोणा सोबतही आघाडी करोत, मुख्यमंत्री म्हणूनच सत्तेत विराजमान होणार ही नितीशकुमार यांची खासीयत. काही वर्षांपूर्वी नितीशकुमारांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडत विश्वासातील नेत्याला त्याजागी बसविले होते. तेव्हा त्यांनी उत्तराधिकारी निवडल्याची चर्चा होती. परंतू, लगेचच नितीशकुमारांनी पलटी मारत त्या नेत्याला पायउतार व्हायला भाग पाडले होते. अशा नितीशकुमारांनी भाजपतून राजकीय क्षेत्रात आलेल्या संजय झा यांना पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष घोषित केले आहे.
संजय झा हे जदयूचे राष्ट्रीय महासचिवही आहेत. भाजपत असताना ते विधान परिषदेचे सदस्यही होते. संजय झा यांच्याविरोधात एकही गुन्हा नोंद नाही, ही त्यांची एक जमेची बाजू राहिली आहे. महत्वाची बाब म्हणजे झा हे भाजप नेते अरुण जेटली यांचे देखील जवळचे आहेत. २०१४ मध्ये त्यांनी दरभंगा येथून लोकसभा लढविली होती. परंतू पराभूत व्हावे लागले होते. २०१९ मध्ये भाजपाला ही जागा गेल्याने त्यांनी तयारी करूनही तिकिट मिळाले नव्हते. संजय झा हे नितीशकुमार यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या झा यांच्या शिष्टाईमुळेच नितीशकुमार लोकसभेआधी भाजपसोबत गेले होते.