पुरातत्व खाते अहवाल सादर करणार; भोजशाला हे हिंदू मंदिर की कमाल मौला मशीद?

0

इंदौर – मध्यप्रदेशमधील वादग्रस्त भोजशाला संकुल ही प्राचीन वास्तू हिंदुंचे मंदिर आहे की मुस्लीम मौलवी कमाल मौला यांची मशीद आहे याचा अहवाल भारतीय पुरातत्व खाते येत्या चार आठवड्यात देणार आहे. हा अहवाल कालच सादर केला जाणार होता. पण काही कारणाने पुरातत्व खात्याने न्यायालयाकडे चार आठवड्यांची मुदतवाढ मागितली आहे.

भोजशाला – कमाल मौला मशीद वादावर 7 एप्रिल 2003 रोजी पुरातत्व खात्याने हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्मियांना प्रार्थनेचा अधिकार देणार्‍या आदेशाला हिंदू फ्रंट फॉर जस्टीस या संस्थेने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपिठासमोर सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणी दरम्यान मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून पुरातत्व खात्याने भोजशाला संकुल परिसरात सलग 98 दिवस संशोधन आणि सर्वेक्षण केले. यावेळी हिंदू देवी-देवतांच्या भग्नावस्थेतील 39 मूर्ती आढळल्या. यामध्ये वाग्देवी, महिषासुरमर्दिनी, गणपती, भगवान शंकर, श्रीकृष्ण, ब्रह्मा आणि हनुमान अशा हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींचा समावेश आहे. या ठिकाणी नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्युटच्या (एनजीआरआय) साह्याने अत्याधुनिक जीपीआर आणि जीआयएस तंत्रज्ञानाद्वारे संशोधन करण्यात आले आहे. हे संशोधन पूर्ण झाले आहे. मात्र संशोधनातून आढळलेल्या पुराव्यांचे विश्लेषण आणि गोळा केलेल्या माहितीचे पृथःकरण करून सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी एनजीआरआयने चार आठवड्यांची मुदत मागितली आहे. त्यामुळे तेवढी मुदत आपल्याला द्यावी, अशी विनंती पुरातत्व खात्याने न्यायालयात केली.

या वादग्रस्त वास्तुसंदर्भात पुरातत्व खात्याने 7 एप्रिल 2003 रोजी जो आदेश दिला तो गेली 21 वर्षे लागू आहे. या आदेशानुसार भोजशाला संकुलात दर मंगळवारी हिंदू धर्मियांना पूजा-पाठ करण्याची तर दर शुक्रवारी मुस्लीम धर्मियांना नमाज पढण्याची परवानगी देण्यात आली. पुरातत्व खात्याच्या या आदेशाला हिंदू फ्रंट फॉर जस्टीस या संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले.

न्यायालयाच्या आदेशावरून पुरातत्व खात्याने केलेल्या संशोधनात हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आढळल्याचा आधार घेत हिंदू पक्ष भोजशाला हे मंदिरच आहे, असा दावा करीत आहेत. तर दुसरीकडे या मूर्ती भोजशाला संकुलाच्या बाजूला असलेल्या झोपडीच्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. भोजशाला संकुलात सापडलेल्या प्राचीन वस्तूंमध्ये त्यांची गणती करू नका, असे कमाल मौला वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल समद यांचे म्हणणे आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech