मुंबई : महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या नेत्यांना सावध राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईतील षण्मुखानंद येथे पार पडलेल्या महायुतीच्या महामेळाव्यात महायुतीचे अनेक नेते, खासदार आणि आमदार सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “एकदा मार पडला आहे. आता गाफील राहू नका. आता ताकही फुंकून प्यायचं आहे,” असे म्हणत त्यांनी कान टोचले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “लोकांच्या मनातले सरकार हवे होते, महायुतीचे, बाळासाहेबांच्या विचारांचे, वैचारीक भुमिकेतील सरकार आपण स्थापन केले. बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे विचार सोबत होतेच. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा खंबीरपणे पाठिशी उभे राहिले. आता महाराष्ट्राचे चित्र पालटले आहे. सर्व कामे ठप्प झाली होती. सर्व ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकलेले होते. सण-उत्सव बंद होते आणि फक्त फेसबुकच चालू होते. आपण आल्यानंतर आनंदाचे वातावरण निर्माण झालं. सर्व निर्बंध हटवले आणि सण-उत्सव जल्लोषात साजरे झाले. राज्याचे वर्तमान सुधारले आणि आता भविष्यही उज्ज्वल करण्याचा ध्यास घेतला आहे.” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
ते पुढे म्हणाले की, “एकजुटीने महायुती मजबूत करून पुढे गेले पाहिजे. आपल्या सरकारचा विचार, विकास आणि विश्वास ही त्रिसुत्री आहे. त्याच्यावर आपण काम करत आहोत. हे सरकार लोकांचे, सर्वसामान्याचे आहे. हे सरकार सर्वांचे आहे. गेली दोन वर्षे आपण पाहिले, तर आपल्या कॅबिनेटमध्ये वैयक्तीक लाभाचा एकही निर्णय घेतला नाही. पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय आपण घेतला. शेतकरी, कष्टकरी, या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. त्याच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे.” असा विश्वास त्यांनी दर्शवला आहे.