राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे प्रयत्न 

0

मुंबई – राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न असून मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने ५० एम.बी.बी.एस. विद्यार्थी क्षमतेने परवानगी दिलेली आहे. उर्वरीत ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अर्ज राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पुर्ण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले,शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता जिल्हा गडचिरोली, जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नाशिक, भंडारा, अंबरनाथ (जिल्हा ठाणे) आणि मुंबई (१० संस्था) येथे १०० एम.बी.बी.एस. विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याकरिता राष्ट्रीय वैद्यक परिषद, नवी दिल्ली यांना अर्ज सादर करण्यात आले होते.

त्रुटींची पूर्तता करण्याची कार्यवाही शासन व संचालनालय स्तरावर सुरु आहे. अध्यापकांची पदे भरण्याची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सुरु असून वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आणि संलग्नीत रुग्णालय या संदर्भातील कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तसेच काही अध्यापकांची पदे कंत्राटी, मानधनावर भरण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

त्रुटी दर्शविलेल्या प्रस्तावित ०९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकरिता राष्ट्रीय वैद्यक परिषद, नवी दिल्ली यांचेकडे शासनामार्फत अपील दाखल करण्यात येणार आहे.या अपिलाच्या सुनावणीस शासनाकडून त्रुटी पूर्तते संदर्भातील हमीपत्र सादर करुन या महाविद्यालयांना परवानगी प्राप्त करण्याच्या अनुषंगाने योग्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत.

सध्या नीट-युजी-२०२४ ची परीक्षा पुढे गेली असल्यामुळे सदर ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी प्राप्त करुन घेऊन या शैक्षणिक वर्षी एम.बी.बी.एस. प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech