आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आता मराठा समाजानेच ओळखावे… मंत्री विखे पाटील यांची शरद पवारांवर बोचरी टीका..

0

 

(अनंत नलावडे)

मुंबई- मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आता मराठा समाजानेच ओळखावे.कारण तब्बल चार वेळा मुख्यमंत्री राहून सुद्धा एकदाही ज्यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही.केवळ मताचे राजकारण करत समाजा समाजात दुही माजवयाची आणि आपली राजकीय समीकरणे मांडायची अशी बोचरी टीका राज्याचे महसूल व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी शरद पवारांचे नाव न घेता विधानसभेत केली.समाजातील लोकांना झुलवत ठेवण्याचे मोठे षडयंत्र आखले जात असल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

मराठा आरक्षणावर महायुतीने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.या बैठकीला महाविकास आघाडीने न जाण्याचा निर्णय घेतला.त्यावरून आज विधानसभेत मोठा गदारोळ झाला.महायुतीच्या सर्व नेत्यांनी विरोधी पक्षाला धारेवर धरत बैठकीला येण्यापासून तुम्हाला कोणी रोखले, कोणाचे मेसेज आले याचा खुलासा करण्याची जोरदार मागणी केली. त्यावेळी याच मुद्द्यावरून मंत्री विखे पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांचा चांगलाच खरपूस समाचारही घेतला.

मंत्री विखे पाटील यांनी नाव न घेता शरद पवारांवर स्पष्ट आणि थेट आरोप केले की,चार वेळा मुख्यमंत्री राहूनही त्यांनी आजतागायत मराठा आरक्षणाच्या बाजूने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही, ना कधी मराठा आरक्षणाच्या बाजूने ब्र शब्दही काढला नाही,ते कोणत्याही मोर्चात दिसलेही नाहीत.त्यांनी कधीही आरक्षणाच्या बाबतीतील आपली भूमिका समाजाच्या समोर मांडली नाही,अशा परखड शब्दात त्यांनी पवारांवर निशाणाही साधला.

त्यावेळी मंत्री विखे यांनी महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री केवळ फेसबुकवर होते.तर त्यांचे नेते रिमोट कंट्रोल वर काम करत राहिले. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण गमवावे लागले असल्याचा थेट आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही थेट निशाणा साधला.

आजही अशाच भूमिकेतून समाजाची दिशाभूल करण्याचे काम विरोधक आणि महाविकास आघाडीचे नेते करत असल्याची टिका करून विखे पाटील यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केले की, त्यांनी मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आता तरी ओळखावे आणि अशा नेत्यांना गावबंदी करावी.

महायुती सरकार हे मराठ्यांच्या बाजूने असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे.यासाठी सरकारने एक पाऊल पुढे येऊन मंगळवारी सर्वपक्षीय बैठकही बोलावली होती.मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकून ते मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सिद्ध करून दाखवले असल्याने त्यांच्या या बेगडी मराठा प्रेमाचा आम्ही निषेध करत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी नमूद केले.
………………

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech