मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच १३ जुलैला मुंबईत येत असून त्यांच्या हस्ते महापालिकेच्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव झ्रमुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील जुळ्या बोगद्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून हा बोगदा जात आहे.
शनिवारी, १३ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता हा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महानगरपालिका प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. गोरेगाव झ्रमुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगांव येथील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांतील मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई पालिकेने गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम हाती घेतले असून हा प्रकल्प चार टप्प्यांत पूर्ण केला जात आहे. या गोरेगाव फिल्मसिटी-खिंडीपाडापर्यंतच्या बोगद्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. तसेच, मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेले पाणी भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून उपलब्ध पुरवले जाते. या केंद्राचे आयुर्मान संपुष्टात येत असल्याने ते नव्याने बांधण्यात येणार आहे. याचेही भूमिपूजन होणार आहे.