ठाणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारमध्ये कंत्राटी पद्धतीने अल्प वेतनावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश करावा, अशी आग्रही मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज विधान परिषदेत केली. त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षणाप्रमाणेच कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत पदवीचे शिक्षण घेणाऱ्या मुलींना फी माफ करावी, अशी मागणी श्री. डावखरे यांनी केली.
राज्याच्या अर्थसंकल्पावरील विधान परिषदेतील चर्चेत भाजपाचे आमदार निरंजन डावखरे सहभागी झाले होते. विकासाचा दृष्टीकोन ठेवून राज्याला दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत आमदार डावखरे यांनी अर्थसंकल्पाला पाठिंबा दिला. या अर्थसंकल्पातून आध्यात्मिक वारसा जपण्याचे महत्वपूर्ण कार्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना क्रांतीकारी ठरेल. या योजनेत २१ ते ६५ वयोगटाचा समावेश झाला असला, तरी वयोमर्यादा ८० करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली. तसेच राज्य सरकारच्या विविध विभागात अल्प मानधन वा वेतनावर कार्य करणाऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही योजनेचा लाभ द्यावा. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न लक्षात घेऊन त्यांच्या समावेशाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
व्यावसायिक शिक्षणासाठी मुलींना १०० टक्के शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करण्यात आले. राज्यात पदवीचे शिक्षण लाखो मुली घेत आहेत. त्यांचे शुल्क माफ करावे, अशी मागणीही आमदार डावखरे यांनी केली.
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या निर्णयाबद्दल आमदार डावखरे यांनी आभार व्यक्त केले. तसेच राज्यातील शिक्षकांना जनगणना व बीएलओची कामे देण्याऐवजी बेरोजगार पदवीधर युवक-युवतींना द्यावीत, अशी मागणीही आमदार डावखरे यांनी केली.