विधानसभा निवडणुकीत मविआ २२५ जागा जिंकेल: शरद पवार यांचा ठाम विश्वास

0

 

( अनंत नलावडे)

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला असून गुरुवारी भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.भालेराव हे लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे आदी उपस्थित होते.यावेळी शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी २८८ जागांपैकी २२५ जागांवर निवडून येईल, असाही ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला.

ते म्हणाले की, उदगीर आणि देवळालीमध्ये जनतेने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून दिले, मात्र दोन्ही विजयी उमेदवारांनी जनतेचा विश्वासघात केला. लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत. तुम्ही कुणाच्या नावावर मते मागता आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी जाता हे लोकांना आवडत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत.पाच वर्षांपूर्वी विरोधी पक्षांचे फक्तं ६ उमेदवार निवडून आले होते. मात्र गेली १० वर्ष लोकांनी मोदी सरकार पाहिले आणि ते बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच यावेळी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तब्बल 31 उमेदवार निवडून आले असून राष्ट्रवादीने १० पैकी ८ जागा जिंकलेल्या असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी २८८ पैकी २२५ जागा जिंकेल,असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक कार्यकर्ते परतत आहेत. तरं सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एमबीबीएस म्हणजे महागाई, बेरोजगारी, भ्रष्ट सरकार. राज्यात गुन्हेगारी वाढत असून हिट अँड रनच्या घटना सातत्याने वाढतच आहेत, महाराष्ट्राचे काय झाले? देश आमच्याकडून शिकायचा, पण तेही आता इकडून तिकडे कॉपी करत असल्याचा टोलाही त्यांनी महायुती सरकारला लगावला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकर भालेराव यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून या जागेवर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री संजय बनसोडे हे सध्या आमदार आहेत.भालेराव यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.आता उदगीरच्या जागेवर संजय बनसोडे आणि सुधाकर भालेराव यांच्यात लढत होण्याची शक्यता असून या जागेवर यावेळची राजकीय गणिते पाहता सुधाकर भालेराव यांचे पारडे जड असल्याचे दिसून येते.
………………..

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech